लघवी झाल्यावर पण पुन्हा जावेसे वाटते. लगेच गेले तरी पुन्हा होते. खोकला आला किंवा शिंक आली तरी लघवी पास होते. कृपया उपाय सुचवावा.
महिला - वय ४८
सारांश -
स्त्रीरोगतज्ज्ञांकडे प्रत्यक्ष तपासणी व योग्य तपासण्या करून निदान व त्यानुसार उपचार करणे गरजेचे आहे. तसेच पंचकर्म -बस्ती चिकित्सेनेही हा त्रास कमी होऊ शकतो.
सविस्तर-
डॉ. वृंदा कार्येकर (स्त्रीरोग तज्ज्ञ) -
ह्या स्थितीला मूत्राशयाच्या तोंडाच्या स्नायूंची कमजोरी किंवा शैथिल्य असे म्हणतात.
कारणे:
१. प्रसूतीच्यावेळी चुकीचा जोर लावणे(बऱ्याच वेळा रुग्ण घरीच कळा देतात. गर्भाशयाचे तोंड उघडण्याआधी दिलेला जोर हा चुकीचा जोर)
२. चिमटा लावून प्रसूती करणे.
३. बऱ्याच दिवसांचा खोकला.
४. अवघड प्रसूती किंवा जास्त वेळ चाललेली प्रसूती इ.
नुसते तोंडी उपाय सांगणं म्हणजे, अश्विनी मुद्रा करता येते. दिवसातून ५०वेळा तरी करावी लागेल. ऍलोपॅथीत स्नायूंची ताकद वाढवणारी औषधे देत नाहीत पण जर असली तर जरूर घ्यावीत . शेवट काही नाहीच झाले, तर शल्य कर्म हा उपाय योग्य ठरतो. पण हे सारं निदान होण्या साठी डॉक्टरांनी तपासून बघणे ही गरज आहे . यासाठी पेशंटने डॉक्टरकडे जायला हवे. ते निदान हाताने तपासूनच कळते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु करावेत.
---------------------------
डॉ. संध्या झाडे (आयुर्वेद) :
१) महिला आहे ४८ वर्ष वय आहे तर पहिली शक्यता prolapse with cysteocele आहे का ते स्त्री रोग तज्ञांच्या कडे जाऊन तपासून घ्यावे.
२) कधी कधी मूत्राशयाचे स्नायू शिथिल पडल्यावर पण असं होवू शकतं.
३) मूत्रमार्गात जंतुसंसर्ग असेल तर लघवी जळजळते किंवा वेदना होतात)
४) मधुमेह आहे का ते रक्तचाचणी करुन खात्री करावी.
५) मूत्राशयामध्ये खडा (stone) असेल तर यासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मूत्रतपासणी, गरज वाटली तर सोनोग्राफी करून घ्यावी.
--------------------------
डॉ. शिवकृष्ण(आयुर्वेद) :
वारंवार होणारी लघवी आणि खोकल्यानंतर आणि शिंक आल्यानंतर त्यावर ना राहणारे नियंत्रण हे प्रामुख्याने मूत्राशयाच्या मुखाच्या स्नायूंची शिथिलता दर्शवते. वयोमानानुसार मूत्राशयात होणाऱ्या गाठी, जंतुसंसर्ग असू शकतो, गर्भाशयाच्या गाठी अथवा त्याला होणारे फायब्रोइड्स जर मोठे असतील तरी सुद्धा त्याचा दाब मूत्राशयावर पडून वारंवार लघवी होऊ शकते.
आयुर्वेदामध्ये वारंवार लघवी अडवून ठेवणे अथवा मुद्दाम कुंथुन लघवीचा प्रयत्न करणे यामुळे होणार वातप्रकोप आणि त्यामुळे येणारी स्नायू शिथिलता याला कारणीभूत मानले आहे, सोबत अन्य रोगांच्या लक्षण समूहात याचा उल्लेख आहे. यासाठी रुग्णाला आवश्यक पथ्ये आणि सोबत बस्ती चिकित्सा आणि अंतर्गत स्नायूंची ताकत वाढवणारी औषधे दिल्यास खूप कमी वेळात हा त्रास कमी होतो आणि पथ्य पाळल्यास पुन्हा लवकर उद्भवत नाही.
#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
➵➵➵ संदेश पुढे पाठवत रहा ➵➵➵
No comments:
Post a Comment