Sunday, July 15, 2018

लघवी झाल्यावर पण पुन्हा जावेसे वाटते

लघवी झाल्यावर पण पुन्हा जावेसे वाटते. लगेच गेले तरी पुन्हा होते.  खोकला आला किंवा शिंक आली तरी लघवी पास होते. कृपया उपाय सुचवावा.

महिला - वय ४८

सारांश -

स्त्रीरोगतज्ज्ञांकडे प्रत्यक्ष तपासणी व योग्य तपासण्या करून निदान व त्यानुसार उपचार करणे गरजेचे आहे. तसेच पंचकर्म -बस्ती चिकित्सेनेही हा त्रास कमी होऊ शकतो.

सविस्तर-

डॉ. वृंदा कार्येकर (स्त्रीरोग तज्ज्ञ) -

ह्या स्थितीला  मूत्राशयाच्या तोंडाच्या स्नायूंची कमजोरी  किंवा  शैथिल्य असे म्हणतात.

कारणे:

१. प्रसूतीच्यावेळी चुकीचा जोर लावणे(बऱ्याच वेळा रुग्ण घरीच कळा देतात. गर्भाशयाचे तोंड उघडण्याआधी दिलेला जोर हा चुकीचा जोर)

२. चिमटा लावून प्रसूती करणे.

३. बऱ्याच दिवसांचा खोकला.

४. अवघड प्रसूती किंवा जास्त वेळ चाललेली प्रसूती इ.

नुसते तोंडी उपाय सांगणं म्हणजे, अश्विनी मुद्रा करता येते. दिवसातून ५०वेळा तरी करावी लागेल. ऍलोपॅथीत स्नायूंची ताकद वाढवणारी औषधे देत नाहीत पण जर असली तर जरूर घ्यावीत . शेवट काही नाहीच झाले,  तर शल्य कर्म हा उपाय योग्य ठरतो. पण हे सारं निदान होण्या साठी डॉक्टरांनी तपासून बघणे ही गरज आहे . यासाठी पेशंटने डॉक्टरकडे जायला हवे. ते निदान हाताने तपासूनच कळते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु करावेत.

---------------------------

डॉ. संध्या झाडे (आयुर्वेद) :

१) महिला आहे ४८ वर्ष वय आहे तर पहिली शक्यता prolapse with cysteocele आहे का ते स्त्री रोग तज्ञांच्या कडे जाऊन तपासून घ्यावे.

२) कधी कधी मूत्राशयाचे स्नायू शिथिल पडल्यावर पण असं होवू शकतं.

३) मूत्रमार्गात जंतुसंसर्ग असेल तर लघवी जळजळते किंवा वेदना होतात)

४) मधुमेह आहे का ते रक्तचाचणी करुन खात्री करावी.

५) मूत्राशयामध्ये खडा (stone) असेल तर यासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मूत्रतपासणी, गरज वाटली तर सोनोग्राफी करून घ्यावी.

--------------------------

डॉ. शिवकृष्ण(आयुर्वेद) :

वारंवार होणारी लघवी आणि खोकल्यानंतर आणि शिंक आल्यानंतर त्यावर ना राहणारे नियंत्रण हे प्रामुख्याने मूत्राशयाच्या मुखाच्या स्नायूंची शिथिलता दर्शवते. वयोमानानुसार  मूत्राशयात होणाऱ्या गाठी, जंतुसंसर्ग असू शकतो, गर्भाशयाच्या गाठी अथवा त्याला होणारे फायब्रोइड्स जर मोठे असतील तरी सुद्धा त्याचा दाब मूत्राशयावर पडून वारंवार लघवी होऊ शकते.

आयुर्वेदामध्ये वारंवार लघवी अडवून ठेवणे अथवा मुद्दाम कुंथुन लघवीचा प्रयत्न करणे यामुळे होणार वातप्रकोप आणि त्यामुळे येणारी स्नायू शिथिलता याला कारणीभूत मानले आहे, सोबत अन्य रोगांच्या लक्षण समूहात याचा उल्लेख आहे. यासाठी रुग्णाला आवश्यक पथ्ये आणि सोबत बस्ती चिकित्सा आणि अंतर्गत स्नायूंची ताकत वाढवणारी औषधे दिल्यास खूप कमी वेळात हा त्रास कमी होतो आणि पथ्य पाळल्यास पुन्हा लवकर उद्भवत नाही.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

➵➵➵ संदेश पुढे पाठवत रहा ➵➵➵

Thursday, July 12, 2018

वजन वाढत नाही सतत अशक्तपणा जाणवतो

प्रश्न - ७

वजन वाढत नाही सतत अशक्तपणा जाणवतो. मी विवाहित आहे दोन आपत्य आहेत.

पुरुष - ३०

डॉ. वृंदा कार्येकर व डॉ. शिवकृष्ण

नुसता अशक्तपणा आहे का वजन कमी होतयं? किती ? BMI काढा व योग्य वजन ठरवा.
https://www.calculator.net/bmi-calculator.html

वजन कमी होणे हे लक्षण आहे,ज्याची कारणे खालील पैकी असू शकतात..

१.सततच्या अशक्तपणाचे काही नेमके कारण समाजात नसेल तर अशा वेळी साधारण रक्तपरिक्षा करून हिमोग्लोबिन चे प्रमाण तपासून घ्यावे. ते जर कमी होत असेल तर त्यावर योग्य तो उपचार सुरू करता येतो.

२. वजन ना वाढण्याला अनेक कारणे असतात जसे पोषक आहार कमतरता किंवा

३.प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक कष्टाची कामे अथवा खाल्लेल्या अन्नाचे पचन ना होणे आणि त्यापासून तयार होणारा आहार रस प्राकृत नसणे. त्यामुळे शरीराचे योग्य पोषण होत नाही.

४. जास्त पित्ताचा त्रास असेल तर आतड्यांवर देखील सूज असू शकते ज्यामुळे पोषक तत्वे शरीरात शोषली जात नाहीत आणि अशक्तपणा आणि  दुबळे पणा येतो.

५. कृमींचा त्रास असेल तर वजन वाढीवर परिणाम होतो. 

६. मधुमेह व थायरॉईड व्याधी मध्ये वजनावर परिणाम होऊ शकतो.

अशा परिस्थितीमध्ये योग्य तो आयुर्वेदिक उपचार  प्रकृती परीक्षण करून केल्यास आणि पंचकर्म पद्धतीची मदत घेतल्यास लवकर फायदा होतो.

प्रथम रक्त तपासणी ,ज्यामध्ये थायरॉईड व मधुमेह तपासणी करून संपर्क साधल्यास कारणमीमांसा करता येईल ..व सविस्तर लिहिता येईल.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

➵➵➵ संदेश पुढे पाठवत रहा ➵➵➵

Tuesday, July 10, 2018

कंबरेचे स्नायू थंडीमध्ये खूप आकडून बसतात

माझ्या कंबरेचे स्नायू थंडीमध्ये खूप आकडून बसतात त्यामुळे कम्बर खूप दुखते यावर उपाय काय आहे
पुरुष - २८

डॉ. शिवकृष्ण (आयुर्वेद) :

थोडक्यात - नियमित योगासने,वजन आटोक्यात ठेवणे, वातप्रकोपामुळे होणाऱ्या कम्बरदुखीसाठी बस्ती उपचार व औषधे; आणि  काही पथ्ये ह्यामुळे कम्बरदुखी नियंत्रणात येऊ शकते.

सविस्तर -

१. कंबरेचे स्नायू जास्त कामामुळे अथवा काहीच काम न केल्यामुळे अशक्त होतात.

२. वजन वाढणे आणि जास्त बैठे काम असे स्वरूप असेल तरी कंबर दुखू शकते. अशावेळी नियमित योगासने करणे फायदयाचे ठरते. 

३. थंडीमध्ये जर कंबरेचे दुखणे वाढत असले तर हे वातप्रकोपामुळे होते आणि यासाठी बस्ती सारखा उत्तम उपचार नाही, योग्य बस्ती क्रम करून घेऊन आणि या नंतर सहचर तेल मात्रा बस्ती सुरू ठेवला असता आणि सोबत काही अंतर्गत घेण्यासाठी औषधे घेतल्यास तात्काळ फरक पडू शकतो. सोबत काही पथ्ये सुद्धा पाळावी लागतात जी व्यक्तिपरत्वे बदलतात.

४. सामान्यपणे वांगी, गवारी , कोरडे पदार्थ, हरभरा डाळ, तूर डाळ , शिळे पदार्थ , थंड पेय, थंड पाणी त्याचप्रमाणे जेवणापूर्वी जास्त पाणी घेणे टाळावे! ही काही सामान्य अपथ्ये आहेत.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

नॉर्मल डिलीव्हरी साठी किती दिवस लागू शकतात?

आम्ही मुंबई ला राहतो....८ व्या महिन्या पर्यंत तिथे डॉक्टर कडे नियमित चेकअप केलं ...आणि डिलीव्हरी साठी गावी घेऊन आलोय....करण आम्ही मुंबई मध्ये दोघेच राहतो...म्हणून तिच्या माहेरी घेऊन आलोय.....तिची पहिली डिलीव्हरी नॉर्मल आहे....सध्या अडीच वर्षाचा एक मुलगा आहे....त्यावेळी आम्ही काही खाजगी हॉस्पिटल मध्ये तिला दाखवलं होत...त्या वेळी डॉक्टर नि एक दिवस वाट बघून सीझर करूया आस सांगितल होत...मग आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो...तिथे आम्हाला काळजी करायचं कारण नाही नॉर्मल होईल असं सांगितलं आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली पण...त्या वेळी पूर्ण ९ महिने १५ दिवस घेतले होते....पण सगळं काही ठीक झालं होतं....

आता या वेळी सुद्धा आम्ही त्याच हॉस्पिटल मध्ये घेऊन जातोय...चेक अप साठी....पण मुंबई च्या डॉक्टर नी आम्हाला २७ जून ची तारीख दिली होती....आणि गावी सरकारी दवाखान्यात ५ जुलै म्हणजे आजची तारीख सांगितली होती...आज तिला ९ महिने १५ दिवस पूर्ण झाले...डॉक्टर नी तपासून सांगितलं की आजून १-२ दिवस लागू शकतात....

माझा प्रश्न असा आहे की त्या डॉक्टरांवर आमचा विश्वास आहे ...पण नॉर्मल डिलीव्हरी साठी इतके दिवस लागू शकतात का....???

------------------

डॉ. पराग भामरे (एमबीबीएस, एम. पी. एच.) -

महाराष्ट्रात माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी राबवल्या जाणाऱ्या सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या कार्यक्रमात मी काम करतो.. दोन्ही क्षेत्रातल्या अनुभवानुसार माझं मत मांडतोय..

गर्भधारणेचा कालावधी पूर्ण झालाय असं शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ९ महिने ७ दिवसांनंतर म्हणजे २८० दिवसानंतर वा ४० आठवड्यांनी मानले जाते. भारत सरकार आणि विश्व स्वास्थ्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ४१ आठवड्या पर्यंत जर नैसर्गिक प्रसूती कळा सुरू झाल्या नाही तर डॉक्टरांनी प्रसूती कळा सुरू करण्यासाठी औषध अथवा तांत्रिक हस्तक्षेप करणं अपेक्षित आहे. नंतरच्या प्रत्येक ७२ तासानंतर प्रसुतीची प्रगती बघितली जाते आणि गरज असल्यास अतिरिक्त हस्तक्षेप केला जातो. हस्तक्षेप केल्यानंतर ७ दिवसात प्रसूती होणें अपेक्षित असते.. एकूणच कुठलीही नैसर्गिक प्रसूती ४२ आठवडे म्हणजे ९ महिने २१ दिवसाच्या आत व्हायला हवी.

टीप - सर्वसामान्यपणे एवढी माहिती पुरे.. या पुढे अधिक माहिती ही प्रत्येक गरोदर महीलेनुसार बदलेल..

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

कानाच्या पडद्याचं छिद्र बरं होऊ शकतं का?

कानाच्या पडद्याला छिद्र असेल तर पेशंट बरा होऊन त्याला पूर्ण ऐकू येऊ शकते का ?

पुरुष - २५

डॉ. अमोल देशपांडे :-

थोडक्यात - नाक ,कान ,घसा तज्ज्ञांना भेटून श्रवणक्षमता तपासणी करून मगच शल्य कर्माविषयी ठरवावे लागेल.

सविस्तर - कानाच्या पडद्यास छिद्र असेल तर ते शस्त्रक्रिया करून भरून काढता येते. परंतु त्या आधी कानाची श्रवणक्षमता तपासावी लागते. या चाचणीत जर कानाची नस व्यवस्थित काम करत असेल आणि फक्त छिद्रामुळे ध्वनी चे संवहन नीट होत नाही असे आढळले तर शस्त्रक्रियेने ऐकू येण्यास सुधारणा होते. कानाच्या पडद्यामागे ३ हाडांची साखळी असते, त्यामध्ये पण काही आजार असेल तर त्याचीही दुरुस्ती शस्त्रक्रियेने करता येते. ह्या शस्त्रकियेचे यशस्वी होण्याचे प्रमाण चांगले असते.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

मुलाची दमछाक आणि अपचन

माझा मुलगा १५ वर्षाचा आहे क्रिकेट खेळतो पण लगेच दमतो.
त्याला अपचनाचा पण त्रास होतो. कृपया मार्गदर्शन करा.

डॉ. अशोक काळे (ऍलोपाथी):

दमणारा रूग्ण, झोपल्यावर नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतो का? तोंड झोपेत कमी अधिक प्रमाणात उघडे रहाते का? खेळताना अधिक हवा घेण्याची गरज असताना श्वसन मार्ग संकुचित असल्यास, गरजेच्या ,तुलनेत हवेचा अनुशेष बनतो, त्यास दमणे म्हणत.

दमणे हे तुलनात्मक आहे. त्याच्या वयाची, तेवढ्याच खेळण्याने दमत नसतील तर विचार करायला हवा. नावडत्या खेळात की आवडत्या खेळात दमतो? मानसिक की शारीरिक दमछाक? शारीरिक असल्यास एरीथ्रोसाईट सेडीमेंन्टेशन दर वाढलेला असू शकतो. 'ई एस आर' - Erythrocyte Sedimentation Rate टेस्ट करून घ्या, दोनशे रुपये खर्च येईल. लाल रक्त पेशी एका तासात किती खाली बसतात, हे या चाचणीत पाहिले जाते.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

लहान मुलाला आकडी येते, मान धरत नाही...

अडीच वर्षाचा मुलगा आहे त्याला आकड़ी येते तसेच अजुन मान पण धरत नही काही उपाय सांगा..

डॉ. शिवकृष्ण (आयुर्वेद) - आकडी येणे म्हणजे मुलांना fits येतात, यामध्ये muscle contraction (स्नायू आखडणे) एवढे असते की ते बाहेरून ताकद लावूनसुद्धा सहसा लवकर निघत नाही, अश्या मुलांमध्ये जीभ दातांमध्ये अडकून ती तुटुही शकते.

ही लक्षणे आयुर्वेदाने 'अस्थिमज्जा धातू विकृती आणि मानसविकार 'अंतर्गत सांगितली आहेत, चांगल्या मेंदूतज्ज्ञाचा सल्ला घेऊन सोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण सुरू ठेऊ शकता, आत्तापर्यंत ६ पेक्षा जास्त लहान मुलांमध्ये सकारात्मक बदल पाहिले आहेत आणि त्यांना चालणे व बाकी साधारण गोष्टी करण्यासाठी सक्षम बनवलं आहे.

डॉ. विकास खामकर (ऍलोपॅथी) -

१. नैसर्गिक वाढीप्रमाणे अडीच वर्षांच्या मुलाला आतापर्यंत मान पकडणे चालणे,पळणे,जिना चढणे या गोष्टी आपोआप यायला हव्यात.

२. आकडी येणे व नैसर्गिक विकासाचे ठप्पे न गाठणे ही गंभीर बाब आहे.ही सगळी लक्षणे एका मोठ्या आजारसमूहाचा(syndrome) भाग वाटत आहेत.

३. लवकरात लवकर लहान मुलांचे डॉक्टर व मेंदूचे तज्ज्ञ(neurologist) यांना बाळ दाखवावे.

डॉ. प्रकाश गंभीर (बालरोग तज्ज्ञ आणि आनुवंशिक रोग तज्ज्ञ) -

या मुलाची दोन्ही लक्षणे ही महत्त्वाची आहेत. सर्वसाधारणपणे मूल ३ महिन्यापर्यंत मान धरायला लागते ते जर अडीच वर्षाला पकडत नसेल तर हे मेंदूच्या मज्जातंतूंच्या किंवा स्नायूच्या आजाराचे लक्षण असू शकेल.

आकडी जर त्याबरोबर असेल तर मेंदूच्या आजाराची शक्यता बळकट होते. ही दोन्ही लक्षणे असल्याने हा गंभीर आजार असू शकतो. त्यामुळे बालरोगतज्ञ मेंदूविकारतज्ञ आणि आनुवंशिक विकार तज्ञ यांचा त्वरित सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
______________________
अधिक माहितीसाठी वाचा :

आकडीवर उपचार शक्य!
लोकसत्ता - https://goo.gl/1qK9NQ

आकडी -
मराठी विश्वकोश - https://goo.gl/5YMc7X
______________________

तात्पर्य :- अधिक वेळ न दवडता वर सांगितलेल्या चांगल्या बालरोगतज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ यांना भेटून उपचार सुरू करावेत.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान